याद पिया की आए, ये दुख सहा ना जाए
बाली उमरिया सूनी कजरिया, यौवन बीतो जाए
बैरी कोयलिया कूक सुनाए, मुझ बिरहन का जियरा जलाए
आँखी दिन रैन जगाए
येत्या चोवीस तारखेला पहाटे जर उस्ताद बडे गुलाम अली खाँ यांच्या या ठुमरीने जाग आली तर आपण वसंतागमनाशी सहृदय झालो आहोत असे म्हणण्यास हरकत नाही! आपल्या प्रेमाचा रंग अग्निज्वाळेसारखा लालसर पिवळा आहे. त्याचा वास आंब्याच्या मोहोराचा आहे. त्याचा आवाज भ्रमराचा आहे. त्याच्या देवता रती आणि मदन आहेत. मैथुन त्याचे कर्मव्रत आहे. स्वत:ची सौंदर्य दृष्टी तयार करणे आणि स्वत:तील सौंदर्य ओळखणे हा त्याचा उद्देश्य आहे. त्याचा स्थायी भाव रती आहे आणि रस शृंगार आहे. प्रेमी याचे विभाव आहेत तर चंद्र, तारे, फुले, भ्रमराचा आवाज, नदी, तलाव, समुद्रावरून वाहणारे वारे आणि अर्थात वसंगागमन हे याचे उद्दीपन विभाव आहेत. मैथुन याचा अनुभाव आहे आणि लज्जा, खळखळून हसणे, आळस वाटणे हे याचे संचारी भाव आहेत.
खरेतर वसंत ऋतूचे कौतुक हे भारतीय मनाला सहज भावणारे असले पाहिजे कारण यात निसर्गाशी एकरूपता आहे. ही प्रेमाची भाषा शिकण्याची, शिकवण्याची, समजण्याची वेळ. प्रेमाची सहजता आणि उत्स्फूरतता अनुभवणे म्हणजे वसंताची आराधना करणे. एरवी सामाजिक मूल्यांमुळे, केवळ भीतीमुळे, न्यूनगंडामुळे व अशाच अनेक कारणांमुळे आपण आपली सौंदर्यदृष्टी झाकून ठेवलेली असते. मात्र वसंतागमनाने ही दृष्टी पुन्हा प्रकाशमान करावी, सभोवताली पाहावे, प्रेम अनुभवावे आणि निसर्गाच्या या प्रेरणेचे कौतुक करावे. त्याचा उत्सव करावा तो वसंतपंचमीला म्हणजेच माघ शुद्ध पंचमीला. यादिवशी पिवळे कपडे परिधान करावे. संभोगशृंगार आणि विप्रलंभशृंगार असे शृंगाररसाचे दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात प्रिय जवळ आहे आणि प्रेम प्रकट करणे व अनुभवणे शक्य आहे. मैथुन शक्य आहे. दुसर्या प्रकारात भेट शक्य नाही. या दोन्हींचे आपापले स्थान आहे. त्यात बरे वाईट, चूक बरोबर काहीच नाही. दोन्हीमधे शृंगाररस प्राप्त होतोच.
तरीही कितीतरी गायक आता खाँसाहेबांच्या बंदिशीतले पहिले कडवे म्हणत नाही. सगळा भर हा 'याद' आणि 'आये' वर दिला जातो. पुढल्या कडव्यात 'कूक सुनाए' वर सर्वाधिक भर गायक देतांना दिसतात आणि नंतर 'जलाए' वर. या फोरग्राउंडिंगमुळे खाँसाहेबांच्या शब्दांचे अर्थच बदलून जातात. खाँसाहेबांचा अंदाज वेगळा होता. प्रणयात घाबरण्यासारख़े काय आहे? बाली उमरिया आपण अनुभवत नाही काय? सूनी कजरिया अनुभवणे आताच्या अपार्टमेंटमधे कठीण आहे हे मात्र खरे. यौवन तर दहावी आणि बारावीतच हरवते आणि मग विशितली (आणि तिशीतलीसुद्धा) पौगंडवस्थेतील माणसे आपल्या सभोवताली दिसतात. ही ठुमरी प्रात:स्मरणीय करावी काय? म्हणजे आपल्याला प्रेम करायला आणि ते माणसासारखे व्यक्त करायला शिकता येईल. :-)
No comments:
Post a Comment