सखी मोरी रुम झूम।
बादल गरजे बरसे ॥
रैन अन्धेरी कालि,
बिजली जमके।
कैसे जाऊँ मैं जल भरन॥
दुर्गा रागात बद्ध ही बंदिश आहे. कोणी रचली कोणास ठाऊक. गाणे शिकायला लागले की दुर्गा हा राग भूप, खमाज, वृंदावनी सारंग, काफी इत्यादी रागांसोबत शिकवला जातो. ओडव ओडव राग आहे हा. म्हणजे यात केवळ पाच स्वर आहेत. आरोहात सा रे म प ध-सां आणि अवरोधात सांधपमरे-सा. याचा वादी स्वर म्हणजे ‘दाखवायचा’ स्वर ‘म’ आहे आणि त्याखालोखालचा स्वर आहे ‘सा’. या रागात रेधसा, मरेप, मपध-म-रेसा, रेपमध-पधसां, धम-रेसा, धम-पधम-रेसा असे स्वर बांधले जातात ज्यामुळे हा राग ओळखता येतो. बंदिश ही शब्दांची रचना म्हणजेच काव्य असले तरी ती गातांना रागाची वैशिष्ट्ये, महत्त्वाचे स्वर आणि रागातील वैशिष्ट्यपूर्ण स्वर रचना दाखवणे अभिप्रेत असते. याच रागातील ‘रसखान रे’ अशी एक बंदिश पंडित भीमसेन जोशी यांनी गायिली आहे आणि ती प्रसिद्ध आहे. मला अगोदर वाटायचे की हे शब्द ‘रस कान्ह रे’ असे आहेत आणि तसे वाटून मी ही बंदिश चक्क कृष्णजन्मात कीर्तनात गायलो. रसखान हा थोर कृष्णभक्त होऊन गेला. तो वैष्णवभक्ती करायचा आणि त्याने अनेक भजने आणि बंदिशी लिहिल्या आहेत. भारतीय संस्कृती कोशात याचे संदर्भ दिले आहेत.
सखी मोरी रुम झूम ही बंदिश गाताना अडखळायला होते ते रैन अन्धेरीच्या वेळी. ही बंदिश बांधली आहे झपतालात. गाताना रैन अन्धेरी नंतर मींड घेतली जाते. म – ध – पध – सां – रेध सां – या शेवटच्या सां वर री ओढली जाते आणि थांबल्यासारखे होते. यामुळे बंदिशीतल्या शब्दांचा अर्थ स्पष्ट होत नाही कारण बंदिश अशी सांगितली जाते – रैन अन्धेरी>>>> कालि बिजली जमके>>>>>. याचा अर्थ बोध होत नाही. त्यामुळे बरेच गायक जमके ऐवजी ‘चमके’ वापरतात. असे केल्याने कालि बिजली चमके>>>> मग ‘कैसे जाऊँ मैं जल भरन’ हे योग्य वाटते. मात्र बिजली काली कशी आणि चमकल्यावर ती काली कशी हे कळत नाही. रैन अन्धेरी काली, बिजली जमके – येथे जमकेवर ठहराव पाहिजे कारण फोरग्राउडिंग येथे संपते. मला वाटते ही चढत्या आवेशाची बंदिश आहे. सखी मोरी --- येथे फोड हवी. नाहीतर सखी – मोरी रुम झूम असे होते ज्याला काहीच अर्थ नाही. सखी मोरे, रुम झूम. रुम झूम कशी? बादल गरजे, बरसे॥ हा सगळा एकूण माहोल झाला. आता त्याचे अधिक स्पष्ट वर्णन – रैन अन्धेरी काली त्यामुळे दिसत नाहिए आणि बिजले जमके – जोरदार वीज चमके आहे. आता प्रश्न पडला आहे कैसे जाऊँ मैं जल भरन. ही शेवटची ओळ जरा खटकते. जल भरन? इतक्या रात्री कशाला जल भरन? की याच्या मागे काही हेतू आहे – पी मीलन?
No comments:
Post a Comment