Friday, 13 January 2012

तुमने किसी की जान को जाते हुए देखा है Tumne kisi ki jaan ko jaate hue dekha hai


तुमने किसी की जान को जाते हुए देखा है? वो देखो मुझसे रूठ कर मेरी जान जा रही है. कडकडीत उन्हात ह्या गाण्याची सुरुवात होते. वाळूत पडलेल्या साधनाचा क्लोज अप आहे. मग पायाने ती शम्मी कपूरला ढकलते. त्यावेळेस ही दोघे समुद्र किनार्‍यालगत असावे असे वाटते.  पुढच्या शॉटमधे एका डोंगरावरून शम्मी कपूर लोळत, गडगडत खाली प्रेक्षकांच्या दिशेने येतो तर साधना हलक्या निळ्या आकाशाच्या बॅग्राउंडमध्ये उभी असते. ती थोड्याशा सिलुएटमधे आहे. तिच्या दोन्ही बाजूला दोन झुडपे आहेत. स्ट्रिंग वाजतात आणि त्यांबरोबर ही ऍक्शन होते. साधना फ्रेमच्या बाहेर निघून जाते आणि शम्मी कपूरही फ्रेमच्या बाहेर जातो. या शॉटमधे कॅमेरा खाली आहे आणि शम्मी कपूर प्रेक्षकांच्या दिशेने लोळत फोरग्राउंडमध्ये येतो आणि फ्रेमच्या बाहेर जातो तर साधना आकाशाच्या बॅग्राउंडमधे झुडपामागे निघून जाते. स्ट्रिंगचे सूर आणि गती आता वर जातात तसा कॅमेरा डोळ्यांच्या पातळीवर येतो आणि साधना खूप मटकत मटकत दूर जाते. आता तिच्या दोन्ही बाजूला आणि बॅग्राउंडलाही खूप झाडे दिसतात. साधनाने नर्तकीचे कपडे घातले आहेत. ते तिचा आकार स्पष्ट करतात. स्ट्रिंग संपतात आणि एका छोट्याशा पॉझमधे खाली पडलेला शम्मी कपूर दिसतो. तो उठतो आणि गायला सुरुवात करतो. येथे तो खाली पडल्या पडल्याच थेट प्रेक्षकांशी बोलतो. ‘तुमने किसी की जान को जाते हुए देखा है?’ हे विचारताना तो रांगत रांगत वर चढतो आणि आपल्याकडे येतो. प्रश्न संपताच एक छोटासा इंटरकट जेथे साधना मागे वळून पाहते. येथे झटकन एक झूमइन वापरला आहे. साधना स्पष्टपणे दिसते न दिसते तोच पुन्हा शम्मी कपूरचा शॉट पुन्हा येतो. आता तो आपल्या दिशेने अधिक जवळ येतो आणि उजव्या दिशेला हात करून सांगतो ‘वो देखो मुझसे रूठकर मेरी जान जा रही है’. शम्मी कपूरने रंगीत शर्ट घातला आहे. संपूर्ण गाण्यात ‘रुठकर मेरी जान जा रही है’ दृश्यरूपाने दाखविले गेले आहे. शम्मी कपूर अंगाने खूप मोठा. त्या तुलनेत साधना खूपच ठेंगणी आणि बारीकशी. शम्मी कपूर तिला ओढतो, ढकलतो तेव्हा तिच्याशी कुस्ती करतो असे वाटले असते पण कॅमेराच्या अँगलमुळे आणि शॉटच्या छोट्या छोट्या टेक्समुळे ते ‘रतीक्रीडा’ करताहेत असे वाटते. यानंतर संपूर्ण वातावरण अधिक क्लोज अप आणि फोरग्राउंड मध्ये फुलांचा वापर करून रोमॅंटिक केले आहे. अगोदरचा रुक्ष वाळवंट आणि डोंगर जाऊन सगळीकडे हिरवेगार, फुलफुलांचे दृश्य आहे आणि शवेटी तर थेट धुकं आहे. शेवटच्या शॉटमध्ये साधना मागून येऊन शम्मीच्या खांद्यावर डोके ठेवते आणि दोघेही धुक्यात हरवतात. संपूर्ण गाण्यात रफीने अतिशय संयत आवाज वापरला आहे. कडव्याच्या पहिल्या दोन ओळी आणि त्या ओळींतील शेवटचे दोन शब्द यांवर भर दिला आहे तर तिसर्‍या ओळीत एक्दम वरचा सूर लावून दोनदा म्हटली आहे आणि पुन्हा चवथ्या ओळीत तोच रोमँटिक स्वर लावला आहे.
रोमॅंटिसिझमचा सुंदर नमुना. शेवटचे mise-en-scene गाण्यातील शब्दांशी जुळवले आहेत कारण शेवटच्या कडव्यात कवी म्हणतो 'मस्ती भरी घटाओं अब जाके रोक लो तुम, तुमको मेरी कसम है, समझा के रोक लो तुम.' त्यामुळे शम्मी कपूरच्या सभोवताली मस्ती भरी घटाएँ तयार होतात आणि मग त्या धुक्यामधून साधना अवतरते जणू धुक्यानेच तिला अलगद ढकलत ढकलत पुढे त्याच्यापर्यंत आणले आहे.  
वर्ष 1964, चित्रपट राजकुमार, गायक मोहम्मद रफी, गीतकार हसरत जयपुरी, संगीत शंकर जयकिशन, दिग्दर्शक के शंकर.

No comments:

Post a Comment