नाही मी बोलत, नाथा,
विनयहीन वदता नाथा, नाही मी बोलत
रणरुचिरा रीती, न शोभे प्रेमा ती,
विनयवती मी कांता।
हे गाणं चित्रपट बालगंधर्व मधे सुरु होतं तेव्हा काळ्या पार्श्वभूमिवर गोरेपान बालगंधर्व लाल काठाच्या काळ्या पातळात अंगभर सोने चढवून उभे असतात. ह्या संपूर्ण गाण्यात नाटकाच्या दृष्यामधे अंधार, काळा रंग, सोनेरी रंगाचा यांचा वापर करून खूप रिच असा फील दिला आहे. एखाद्या ऑपेरामधे असतो तसा. गाण्यातील नाटकाच्या दृश्यात सर्वात चमचमणारी आणि उठून दिसणारी प्रतिमा बाल गंधर्वांची आहे. कृत्रिम प्रकाश योजनेमुळे हे एका नाटकातलं वास्तव आहे असं चित्र उभं राहतं आणि अर्थातच संपूर्ण चित्रपटात हे खूप प्रभावीपणे हाताळलं गेलं आहे. नाटकावर चित्रपट करत असतांना खूप काळजी घ्यावी लागते ती याचीच. एकीकडे नाटक पाहणार्या प्रेक्षकांचा दृष्टिकोन असतो तर दुसरीकडे त्या नाटकावरील चित्रपट पाहणार्यांचा, त्या नाटकात काम करणार्यांचाही दृष्टिकोन दाखवायचा असतो. चित्रपट अगदीच 'डीग्लॅमराइझ' होण्याची भीती असते. चित्रपटरूपात नाटक होण्याची भीती असते. बाल गंधर्वमधे ज्या ज्या वेळेस नाटक दाखवले गेले आहे त्या त्या वेळेस ही कसरत करावी लागली आहे.
'नाही मी बोलत नाथा' या गाण्याच्या अगोदर आपल्याला सांगितलेले आहे की गंधर्वांची मुलगी वारली आहे. तरीही ते नाटकाला उभे राहिले आहेत कारण त्यांच्या निष्ठा नाटकाशी आणि प्रेक्षकांशी आहेत. येथे बाल गंधर्वांची घालमेल, त्यांच्या सहकार्यांची घालमेल आणि प्रेक्षकांचे या संपूर्ण पार्श्वभूमीबाबतचे अज्ञान दाखवायचे आहे. साधारण एक मिनीटात 'नाही मी बोलत' चे नाटकातले फोरग्राउंडिंग झाल्यानंतर सूर बदलतात. यावेळेत आपण एक नाटक पाहतो आहोत असा भास प्रभावी केला आहे. तबल्याचे क्लोज अप, पेटीचे क्लोज अप, गंधर्वांचे मिड क्लोज अप, विंगेत उभे असलेल्या त्यांच्या सहकार्यांचे क्लोज अप इंटरकट करून सिलुएटमधे मधे मधे प्रेक्षक दिसतील असे लाँग शॉट घेतले आहेत. यांतून एका नाटकावर हा चित्रपट आहे अशी भूमिका तयार होते.
येथे पहिले कडवे संपते आणि 'नाही मी बोलत' वर गंधर्व पुन्हा येतात. आतापर्यंत हा संवाद नाटकातील दोन पात्रांमध्ये होतो आहे. आता सूर बदलतात, ताल बदलतो, किंचित लांबतो आणि मग आपल्याला 'नाही मी बोलत' मध्ये कोण कोणाला हे म्हणत आहे याचे वेगळेच दर्शन होते. इंटरकट्स वापरून कथा नाट्यागृहाच्या बाहेर जाते आणि आपण बाल गंधर्वांच्या घरी नेले जातो. त्यांची मुलगी गेली आहे. 'नाही मी बोलत' हे त्यांची बायको त्यांना म्हणते आहे काय? की मुलगी? की ते स्वत: परमेश्वराला म्हणताहेत? की त्यांचे सहकारी त्यांना म्हणताहेत? अशाप्रकारे अनेक दृष्टिकोनांतून हे चित्रपटीय नाट्य खुलते.
नाटकातील दृष्यातले बाल गंधर्व घरी पोहोचतात आणि त्यांचे खरे रूप दिसते. नाटकातील ग्लॅमरच्या समोर प्रत्यक्ष आयुष्यातील गंधर्व अगदी सादे, त्यांचे घर ओकेबोके, त्यांची पत्नी अगदी सादी वाटतात. हा काँट्रास्ट खूप शार्प केला आहे त्यामुळे ‘नाही मी बोलत’ हे गाणे नाटकातील प्रेक्षकांसाठी एक अर्थ देऊन जाते, पात्रांसाठी एक अर्थ देऊन जाते आणि चित्रपट पाहात असलेल्या आपल्याला वेगळेच अर्थ देऊन जाते.
बाल गंधर्वांनी गायिलेलं हे गीत येथे मिळेल http://www.youtube.com/watch?v=lpm6BfdJZvg
वर्ष 1911, गीतकार कृष्णाजी खाडीलकर, संगीत गोविंदराव टेंबे, नाटक संगीत मानापमान, राग खमाज, ताल दादरा. याच गाण्याला कौशल इनामदारने संगीत दिले चित्रपट बाल गंधर्वमधे. यात जाझ व्हायोलिन वादक ख्रिस्टियन होवेसची मदत घेण्यात आली होती.
This comment has been removed by the author.
ReplyDeleteNice description Sir. I could somehow relate this song and movie with "Jeena yahan, marna yahan..." song of Raj kapoor's 'Mera naam Joker'. Also it is worth appreciating that you wrote this blog in Marathi. Please write more as I feel apart from various discussions in college, all of us can be discuss such meaningful stuff on blogs regularly.
ReplyDelete