Monday, 9 January 2012

जुलमी संग आँख लडी रे Zulmi sanga aankh ladi

 गाणं सुरु होण्याअगोदर खालच्या पोझिशनमधून शॉट सुरू होतो. वैजयंतीमाला घागरा, चोळी, दुपट्टा असा पोषाख़ परिधान केलेली आहे. ती फोरग्राउंडमध्ये खाली जमिनीवर बसलेली आहे. ती ज्या पद्धतीने बसली आहे आणि कॅमेरा ज्या पद्धतीने तिच्या जराशा उजवा हाताला ठेवला आहे त्यामुळे आपण प्रेक्षक या फ्रेममध्ये तिचे 'कॉंफिडांट' आहोत आणि आपण तिच्या सोबत आहोत असे चित्र निर्माण होते. ती एका बैलगाडीमागे लपली आहे. आपल्याला त्या बैलगाडीचे चाक आणि बैलाचे तोंड व पाय दिसतात. तिचा चेहरा आणि बैलाचा चेहरा कॅमेर्‍याच्या एकाच रेषेत आहेत. पुढल्या शॉटमध्ये आपण एका वेगळ्या दृष्टिकोनात नेले जातो. हा आपल्यासाठीचा स्वतंत्र दृष्टिकोन आहे. ती काय पाहते आहे हे आता आपल्याला दिसते. आता फोरग्राउंडमध्ये बैलगाडीचे चाक आहे जे खूप मोठे दिसते आहे. जाणू आपण तिच्या पुढे जाऊन ती काय पाहते आहे ते पाहण्याचा प्रयत्न केला आणि त्या चाकाच्या आरीतून आपल्याला नायक दिलिपकुमार उभा दिसतो. तो काही शोधत असल्यासारखा इकडे तिकडे पाहतो आहे. येथे आपण प्रेक्षक म्हणून वैजयंतीमालाच्या अधिक जवळ जातो कारण अगोदर तिने आपल्याला तिच्या जवळ केले असते आणि मग आपल्याला ती जणू दाखवते की ते पाहा माझे सीक्रेट!
हा शॉट संपायला अगदी थोडा अवधी देऊन संगीत सुरू होते. आतापर्यंतच्या हालचालींची गती आणि या संगीताची गती यात तफावत आहे. ही गती जलद आहे. त्याला स्ट्रिंगचे स्ट्रोक्स दिले आहेत. त्यामुळे ताल आधी आपल्या डोक्यात सज्ज होतो. इथून पुढे तालाचे फोरग्राउंडिंग होते. येथे शॉट बदलतो आणि आपण पुन्हा सुरुवातीच्या पोझिशनला जातो. आता वैजयंतीमाला वळते आणि थेट आपल्याकडे पाहते आणि आपण संपूर्णपणे तिच्या बाजूने पुढचे सगळे पाहणार, अनुभवणार, ऐकणार याचे फोरग्राउंडिंग तयार होते. त्या एका लुकमुळे आपले आणि वैजयंतीमालाचे सख्य निर्माण होते. आपण तिचे कॉंफि डांट आहोत हे इथे स्पष्ट होते. शॉटच्या शेवटी संगीताची फ्रेझ बदलते आणि ती फ्रेमच्या डाव्या बाजूला पटकन निघून जाते. ती कुठे गेली असा प्रश्न आपल्या डायजेसिकमध्ये राहून जातो. आता वाइड शॉट ज्याच्या फोरग्राउंडमध्ये पुन्हा उजवीकडे बैलगाडीचे चाक दिसते आहे. डावीकडे काय आहे ते लक्षात येत नाही. मात्र फ्रेम आता या दोघांच्यामधून दिसते. अगोदरच्या तीन्ही सींसमध्ये जे मेझएसाँ वापरले आहे तेच येथे पुढे नेले जाते मात्र आता त्यातील बैलगाडी हा एलिमेंट कडेला गेला आहे. म्हणजेच ती बैलगाडी ही केवळ सीन भरण्यासाठी होती, ती महत्त्वाची नव्हती. आता गाण्याची लय आणि फ्रेझेस आपल्याला सांगतात की थोड्याच वेळेत आपल्या कळेल की वैजयंतीमाला कुठे गेली आहे. येथे बैलगाडीचा वापर पूर्ण होताच तिला मार्जिनलाइझ केले आहे. फ्रेममधे मोकळे मैदान आहे आणि त्याच्या मधोमध एका उंच दांडीवर एक छोटेसे छत आहे. आता कोरस सुरू होतो. काही बायका वैजयंतीमालाने जसा पोषाख केला आहे तशाच पोषाखात नाचत येतात आणि खांबाच्या डाव्या बाजूने येत खांबाच्या भोवती नाचत एक रिंगण तयार करतात. हे रिंगण पूर्ण होते तोच त्या स्त्रिया आणि फोरग्राउंडमधील बैलगाडी इत्यादी यांच्यामधील मोकळ्या जागेत काही पुरु ष फ्रेमच्या डाव्या बाजूने त्या स्त्रियांकडे पाहात आत येतात. आता आपण खूप मोठ्या एका नाचगाण्याच्या कार्यक्रमाचे प्रेक्षक होऊन जातो तरीही एका अर्थाने अगोदरच्या शोट्समुळे आपण या नाचण्या गाण्याच्या आतही असतो. आता हा सगळा कोरस अगोदरच्या स्ट्रिंग्सची लय, सूर आणि फ्रेजला मनुष्यरूप देतो. परसॉनिफाय करतो. यामुळे तालाला आणि सुराला एक बॉडी मिळते. पायांचे खालच्या अँगलमधून केलेले चित्रकरण आणि गाणार्‍या चेहर्‍यांचे वरच्या अँगलमधून केलेले चित्रीकरण यांतून पुढे तेच परसॉनिफिकेशन अधिक गडद केले जाते. ही फ्रेझ संपते आणि वैजयंतीमाला फ्रेमच्या डाव्या बाजूने नाचत आत येते. तिच्यापेक्षा किंचितशा उंच अशा अँगलवरून तिचा मिडशॉट आहे आणि त्यानंतर लाँगशोट. आता गाणे सुरू होते - जुलमी संग आँख लडी, जुलमी संग आँख लडी रे.
गाण्याच्या सुरुवातीला जुलमी ही एक व्यक्ती फोरग्राउंड केली आहे. या जुलमी व्यक्तीशी प्रेम जुळलं आहे असं नायिका सांगते. मग तो जुलमी कोण? फ्रेझ संपते न संपते तोच एका छोट्या गल्लीतून दिलिप कुमार पाठमोरा आवाजाच्या दिशेने पाठमोरा चालत जातो. फोरग्राउंडमध्ये त्याच्याकडे पाहणारा एक छोटा मुलागा आहे. या मुलामुळे आपण आता दिलिप कुमारच्या बाजूनेही प्रसंगात शिरतो. म्हणजे इतक्या वेळ आपण केवळ वैजयंतीमालाच्या बाजूने जे पाहत होतो ते आता पहिल्यांदा दिलिप कुमारच्या बाजूने पाहतो आहोत. मात्र हे पाहणे गौण आहे हे सांगण्याकरता कॅमेर्‍याची लेव्हल खाली आहे आणि फोरग्राउंडमध्ये एक छोटा मुलगा दिसतो. आता गाणे पुढे सरकते.
सखी मैं का से कहूँ, री सखी का से कहूँ,  जाने कैसे यह बात बढी.
पहिल्या वाक्यानंतर आता नायिकेला प्रश्न पडला आहे. कोणाला सांगू ही घटना घडल्याचं? ती लाजते, एका खांबामागे जाते. आता लाँगशॉटवरून कॅमेरा तिच्या जवळ जातो. गाण्यातील 'सखी' आपण अगोदरच केलेले आहोत. आपले तिच्याशी सख्य स्पष्ट झाल्यामुळे आपण तिच्याबरोबर नाचतो, गातो आणि लाजतो देखील. खांबाच्यामागून ती आधी चेहरा लपवते आणि मग पुन्हा बाहेर येते. आता डिसॉल्व्ह आणि आपल्याला तिचा जुलमी दिसतो.

हा शॉट खूप मजेशीर आहे कारण फोरग्राउंड मध्ये दोन पुरुष आहेत जे गरीब अथवा गावंढळ दिसतात. त्यांनी कोळ्यांसारख्या अथवा मुसलमान घालतात त्याप्रकारच्या टोप्या घातल्या आहेत. एकाने मजूर घालतात त्यासारखे जाकीट घातले आहे. त्यांचे चेहरे सुरकुतलेले, थकलेले, कष्टी आहेत. खूप ऊन आहे. ते निश्चित काळे आहेत आणि या चेहर्‍यांच्या मधोमध दिलिप कुमार काळ्या टी शर्ट मध्ये, पांढरे जाकीत घातलेला आहे. त्याचा चेहरा चक्क उजळला आहे. गोरापान आहे. तो प्रसन्न मुद्रा ठेवून आहे. त्याच्या आजूबाजूला दोन पुरुष आहेत तेदेखील फोरग्राउंडमधील पुरुषांसारखेच आहेत.  मागे कौलारु छताचे घर आहे. हा शॉट जेमतेम तीन सेकंदांचा आहे. लगेचच वैजयंतीमालाचा मिड क्लोज अप मध्ये ज्यात ती डुलते आहे, हसते आहे, लाजते आहे. येथून पुधे ती दोघे एकमेकांकडे पाहत आहेत असा आभास निर्माण केला जातो. खरे तर जर प्रत्यक्ष अंतर आणि गर्दीचे स्वरूप पाहिले तर त्या दोघांना एकमेकांकडे पाहणे अशक्य असेल. मात्र चित्रपटीय बोलीतून हा परिणाम साधला जातो. पुढील कडव्यात 'बंसरी बजाय',  'सुनाए' आणि त्यानंतर 'राग रे' हे शब्द ज्या सुरात आणि पद्धतीने म्हटले आहेत ते लता मंगेशकर यांनी गाण्यातून केलेला अभिनय आहे. त्याच्या जोडीला एकूण संगीत, वापरलेली वाद्ये, कॅमेराच्या फ्रेम्स आणि वैजयंतीमाला यांच्या संयोगाने रती हा भाव प्रभावीपणे तयार होतो.
चित्रपट मधुमती, वर्ष 1958, दिग्दर्शक बिमल रॉय, गीत शैलेंद्र, संगीत सलील चौधरी. गाणे विडियोसकट येथे आहे
http://www.youtube.com/watch?v=PEqixOEVuDM

No comments:

Post a Comment