Sunday, 22 January 2012

नैन मिले चैन कहाँ दिल है वहीं तू है जहाँ Nain mile chain kahan



खरेतर एक मराठी गाणे सुरू होते डोक्यात सकाळी उठलो तेव्हा पण ते गाणं जाऊन हे गाणं कधी सुरू झालं कळलंच नाही. ते मराठी गाणं कुठलं होतं ते आठवायचा प्रयत्न केला पण काही केल्या ते गाणं आठवलं नाही.
बासरीच्या सुरांनी हे गाणं सुरू होतं. भारत भूषण ती वाजवतो आहे. वर उजव्या बाजूने त्याच्या चेहर्‍यावर प्रकाश पडतो आहे आणि पाठीवरही. त्यामुळे त्याच्या शेहर्‍याला आणि शरीराला एक स्पष्ट प्रकाशमान काठ मिळतो. बासरी प्रकाशमान झाल्यासारखी भासते. त्याच्या चेहर्‍यावर हलका प्रकाश आहे. निम्मी ही एक नर्तकी आहे. ती त्या बासरीच्या सुरांचा मागोवा घेत सीनमधे प्रवेश करते. फुलांची आणि वेलींची बाग आहे. प्रकाशाच्या विशिष्ट योजनेमुळे फुले प्रकाशमान झाली आहेत आणि त्यांना फांद्यांचे आणि पानांचे सिलुएट लाभले आहे. निम्मी आपल्या शरीराला एक विशिष्ट वाक देते जणू तिचे शरीर एका दिशेने ओढले जात आहे आणि ती खेचल्यासारखी चालते ज्यामुळे असा भास निर्माण होतो की तिचे मन तिला ओढत नेते आहे. सुरुवातीला जेव्हा ही सांगीतिक फ्रेज सुरू होते तेव्हा ती स्वर शोधते आहे आणि समोर न पाहता चालते आहे. एका खोलगट भागाकडे ती जाते. पुन्हा भरत भूषण दिसतो. सूर आता आरोहात आहेत आणि त्यांची पट्टी वाढते. निम्मी आता मान वर करत किंचितशा चढावावरून चालते आणि कॅमेरा पॅन करतो. कॅमेरा सरळ रेषेत पॅन करतो आणि निम्मी वरच्या रेषेत चढते त्यामुळे सुरांनी खेचलेली निम्मी जणू वरवर चालली आहे. मग ती सरळ रेषेत येते आणि भारत भूषणच्या समोर उभी राहते तोपर्यंत सूर पुन्हा समेवर येतात. लागलीच मिड क्लोज अप मधे दोघे येतात. आता भारत भूषणचा स्पष्ट प्रोफाइल दिसतो. त्याच्या केसांची ठेवण, नाक, गाल आणि छाती यांचे काठ प्रकाश योजनेमुळे प्रकाशमान होतात. या उलट निम्मीचा चेहरा तीन चतुर्थांश प्रकाशमान केला आहे. तिचे गाल, नाक, ओठ, डोळे आणि छाती प्रकाशमान केली आहे. एका संभाषणानंतर ती त्याच्या पासून दूर जाते आणि हार्मोनियमच्या सुरांनी धरलेल्या तालावर गाण्याला सुरुवात होते. तो ताल आणि सूर यांचा फोरग्राउंडिंग ठरतो. निम्मी क्लोज अप मध्ये येते. ती दोन्ही खांद्यांवरून प्रेक्षकांशी बोलते. अंतरा संपतो आणि एकदम मन्ना डेचा आलाप ऐकू येतो. तेव्हा ठेका केवळ की बोर्डमुळे ऐकू येईल न येईल इतक्या आवाजात अगदी काही सेकंद वाजतो आणि मग केवळ सूर राहतात. त्याच्या आलापावर केवळ निम्मीची प्रतिक्रिया दिसते. ती आश्चर्यचकित होते आणि आनंदितही होते. तो आलाप संपतो तेव्हा निम्मी आणि भारत भूषण क्लोज अप मधे येतात. यावेळी दोघांचे चेहरे तितकेच आणि एकसारखेच प्रकाशात आहेत. आता सूर संपूर्णपणे थांबतात आणि संभाषण आहे. निम्मीच्या सांगण्यावरून भारतभूषण पुन्हा गातो – आणि त्याचे गाणे सुरू होताच पहिल्यांदा आपल्याला भारत भूषणचा संपूर्ण चेहरा आणि शरीर प्रकाशमान दिसतो. कॅमेरा खालून वरती पाहतो. आपण निम्मीच्या अंगाने भारत भूषणकडे पाहतो. तिचे कौतुक आपले कौतुक होते. ते संपूर्ण कडवे एकाच दृष्टिकोनातून दिसते – निम्मीच्या. मग ती त्याच्या शब्दांना उत्तर देते आणि पुढच्या संपूर्ण गाण्यात प्रकाशयोजना आणि एकूणच फ्रेममधे ती दोघे असतात कधी प्रत्यक्षरूपाने तर कधी एकमेकांच्या अभिनयातून प्रकट होत.  

चित्रपट बसंत बहार, वर्ष 1956, संगीत शंकर जयकिशन, गीत शैलेंद्र, दिग्दर्शक राजा नवाथे, कॅमेरा एम राजाराम.

No comments:

Post a Comment